आदरणीय पवार साहेबांकडून भावपूर्ण शब्दात श्रद्धांजली

मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर संस्थेतील माझे सहकारी व माजी सनदी अधिकारी श्री. शरद काळे यांच्या दु:खद निधनाने मला धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने मी एका अतिशय प्रामाणिक, परिपक्व सहकाऱ्याला मुकलो आहे. त्यांच्या कुटुंबियांना या संकटातून सावरण्याचे बळ मिळो आणि श्री. काळे यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच प्रार्थना, अशा भावपूर्ण शब्दात आदरणीय खासदार शरद पवार साहेबांनी शरद काळे सरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'प्रथम’ ह्या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बालशिक्षण प्रसार व गुणवत्तावाढ कामात तसेच एशियाटीक लायब्ररीचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना साहित्य संवर्धन, संशोधन व ज्ञानप्रसार कार्यात मोलाचे योगदान दिले. शरद काळे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्थेमध्ये ते अनेक वर्षांपासून सरचिटणीस म्हणून काम पाहत होते. त्यांच्यामधील ह्या अंगभूत गुणांमुळेच त्यांना केंद्र सरकारमध्ये स्व.यशवंतराव चव्हाणसाहेबांसोबत काम करण्याची संधी मिळाली, अशा त्यांच्या आठवणी आदरणीय पवार साहेबांनी जागवल्या आहेत.

वित्त व योजना विषयांचा जाणकार अधिकारी म्हणून त्यांची दिल्लीत ओळख होती. बृह्नमुंबई महापालिकेचे आयुक्त , सहकार आयुक्त, योजना सचिव, मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख, लोकायुक्त अशा महत्वाच्या पदी काम करत असताना त्यांनी एक ‘लोकाभिमुख व पारदर्शी प्रशासक’ असा आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९६३ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेले श्री. काळे यांनी अभ्यासू वृत्ती, शांत-संयमी स्वभाव, सचोटी या गुणांच्या बळावर राज्य आणि केंद्र सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे सांभाळल्या, असे आदरणीय पवार साहेबांनी म्हटले आहे.