यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२५' नुकताच प्रसिद्ध संशोधक प्रोफेसर डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. १२ मार्च रोजी आयोजित या सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. गुप्ता म्हणाले की, "परिस्थितीने गरीब असलेली माणसे ज्ञानाने गरीब नसतात; परंतु समाजात समान संधी उपलब्ध नसल्यास प्रगती खुंटते. संशोधन हे लोकांच्या भाषेत पोहोचले तरच ते सार्थ ठरते. मधमाशा ज्याप्रमाणे विखुरलेले पराग एकत्र करून मध निर्माण करतात, त्याचप्रमाणे मी तळागाळातील लोकांच्या नवोपक्रमांचा शोध घेण्याचे काम केले आहे." स्वयंपाकघरातील भांडी लावण्याच्या पद्धतीवरून संस्कृती ओळखता येते, असे निरीक्षण नोंदवत त्यांनी चव्हाण सेंटरच्या कार्याचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्रातील ४२ हजार गावांची प्रगती जगासमोर आणण्यासाठी प्रत्येक गावाची स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. हा सन्मान केवळ माझा नसून, शोधयात्रेदरम्यान ज्या सामान्य माणसांनी आपल्या कौशल्याने मला समृद्ध केले, त्या सर्वांचा हा गौरव आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे असून, यासाठी विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने डॉ. गुप्ता यांची निवड केली. या निवड समितीमध्ये डॉ. रूपा शाह, डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. सुहास पेडणेकर, डॉ. नरेंद्र जाधव, श्री. विवेक सावंत, आर्किटेक्ट आय.एम. काद्री आणि डॉ. अंकुशराव कदम यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी प्रास्ताविकातून चव्हाण सेंटरच्या गेल्या चार दशकांतील कार्याचा आढावा घेतला आणि यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील आधुनिक महाराष्ट्र घडवण्यासाठी सेंटर कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त नामदार श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी डॉ. गुप्ता यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. गुप्ता यांनी सुचवलेली 'गावे वेबसाईटद्वारे जोडण्याची संकल्पना' आपण स्वतःच्या मतदारसंघापासून राबवण्यास सुरुवात करू, असे त्यांनी जाहीर केले. यशवंतराव चव्हाण हे नेहमीच विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा विचार करत असत आणि तोच वारसा सेंटर पुढे चालवत असल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्याला डॉ. अनिल काकोडकर, विवेक सावंत, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अदिती नलावडे, बी.के. अगरवाल, डॉ. समीर दलवाई, निर्मला सामंत-प्रभावळकर, लक्ष्मणराव ढोबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि राष्ट्रगीताने या सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.




