यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार ’ दिला जातो. यावर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ अझीम प्रेमजी यांना जाहीर झाला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच १२ मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असून चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

चव्हाण सेंटरच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये तसेच सामाजिक-आर्थिक या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या नामवंत व्यक्तीला 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' देण्यात येतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र व पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पद्मविभूषण अझीम प्रेमजी हे उद्योग जगतातील एक अग्रगण्य नाव आहे. ते नेहमी म्हणतात, नैतिक, निष्पक्ष आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील व्यवसाय पद्धती वापरण्याची आणि मूलभूत सामाजिक समस्यांशी संलग्न राहण्याची जबाबदारी उद्योगांवर आहे. विप्रो लिमिटेडचे ​​संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय आयटी उद्योगाचे जनक म्हणूनही त्यांची ओळख आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षण यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये अझीम प्रेमजी यांचे योगदान आहे.