मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ व्यासंगी लेखक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे आणि कोषाध्यक्ष मा. हेमंत टकले यांनी हा पुरस्कार जाहीर केला. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच २५ नोव्हेंबरला हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असून चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ दिला जातो. कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. दोन लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारासाठी मधु मंगेश कर्णिक यांचे नाव कोकण मराठी साहित्य परिषदेकडून सुचवण्यात आले होते. मधु मंगेश कर्णिक यांनी मराठी साहित्यात सातत्याने कसदार लेखन करून मोलाची भर घातली आहे. कर्णिक यांनी १९९० साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. २००२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव, जनस्थान आदी पुरस्कारांसह कर्णिक यांना ३० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. वयाची नव्वदी पार केल्यानंतरही साहित्य, संस्कृती, मराठी विकास यासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत.