मुंबई, ता. २५(प्रतिनिधी):यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना गौरवपूर्वक प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर,सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, माजी आमदार हेमंत टकले, चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले, चव्हाण सेंटरचे विश्वस्त, सदस्य आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मधु मंगेश कर्णिक म्हणाले, "साहित्य हे अमोघ असते. अनेक आक्रमणांनंतर एक देश म्हणून भारताला एकत्र ठेवणारी 'महाभारत' आणि 'रामायण' ही साहित्य आहेत. जोपर्यंत हे दोन ग्रंथ आहेत, तोपर्यंत देशाच्या धर्माला धोका नाही आणि भारताचा एकच धर्म तो म्हणजे मानवता धर्म जगाला प्रेम अर्पावे हाच एक आमचा धर्म आम्हाला कळतो." पुढे त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आठवणी सांगून सभागृहाला भावुक केले. यशवंतराव चव्हाण साहेबांचा वसा आणि वारसा जोपासण्याचे काम आदरणीय शरद पवार करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले.

याच कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश व यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुरस्कार निवड समितीचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती वाय. व्ही.चंद्रचूड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा 'मा. न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रचूड पुरस्कार' मुंबई विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात एल एल एम च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारे व प्रथम आलेले सिद्धार्थ साळवे व अपूर्वा केरकर यांना प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले, “यशवंतराव चव्हाण हे राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक तसेच उत्तम वाचक होते. यशवंतराव यांना ज्या क्षेत्राची आवड होती, त्याच क्षेत्रातील सर्वोत्तम साहित्यिक म्हणून मधू मंगेश कर्णिक यांची या पुरस्कारासाठीची निवड सार्थ आहे.”

चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार उद्योगपती अझिम प्रेमजी यांना जाहीर करण्यात आला. निवड समितीच्या वतीने ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी ही घोषण केली.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत यशवंतरावांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम चव्हाण सेंटरची टीम करत आहे. सर्वांच्या मदतीने पुरोगामी विचारांचा,समृद्ध असा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण उभा करु असे आवाहन यावेळी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी केले.

या पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन अंबरीश मिश्र यांनी केले.