यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्कार सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजे तिसऱ्या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांनी केली असून विविध क्षेत्रातील सहा कर्तृत्ववान महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम दि २२ जून २०२४ रोजी बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास आदरणीय शरद पवार साहेब,माजी खासदार पद्मश्री अनु आगा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामान्य स्त्रिया संकटांशी दोन हात करत आपले ध्येय कसे गाठतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कशा प्रगतिपथावर आणतात, हे अनुभवण्याचा हा सोहळा आहे. सन १९९४ साली जाहीर झालेल्या महिला धोरणाला यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहेत, त्याचे औचित्य साधून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता व क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक स्त्रीकेंद्री आत्मभान जपत मराठी कवितालेखनाला अनुभव व अभिव्यक्तीचे एक नवे परिमाण उपलब्ध करून देणाऱ्या ‘ललददास्य ललबाय’ या कविता संग्रहाच्या लेखिका मीनाक्षी पाटील(मुंबई) यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', स्वावलंबी शेतकरी महिला संघटना चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही कलावती सवंडकर(हिंगोली) यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', एकल स्त्रियांना सक्षमीकरणाकडे समर्थपणे घेऊन जाणाऱ्या तसेच हजारो स्त्रियांच्या शोषणाचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदलाची पहाट आणणाऱ्या रुक्मिणी नागापुरे (बीड) यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान’, विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या संध्या नरे पवार(मुंबई) यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान’,आपल्या उद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या राजश्री गागरे(भोसरी-पुणे) यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान’, शूटिंग एंड राइफल ट्रेनिंग क्षेत्रामधील निष्णात महिला प्रशिक्षक श्रद्धा नलमवार(नाशिक) यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

या सर्व महिला “यशस्विनी सन्मान पुरस्कारा” च्या मानकरी ठरल्या आहेत. या सर्व यशस्विनींचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचा गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.