यशवंतराव चव्हाण सेंटरचा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार नीलेश निमकर लिखित 'शिकता शिकविता’ या पुस्तकाला जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातून आलेल्या शैक्षणिक विषयावरील पुस्तकांचा अभ्यास करून निवड समितीने एकमताने या पुस्तकाची निवड केली. येत्या २६ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थिती हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

'शिकता शिकविता’ या पुस्तकात शिकण्याच्या प्रक्रियेची गोष्ट सांगितली आहे. एक तरुण, आदिवासी भागात शिक्षक म्हणून रुजू होतो, तेथे रमतो, आदिवासी मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचले पाहिजे यासाठी धडपडतो त्याची गोष्ट म्हणजे हे पुस्तक आहे.

लेखक नीलेश निमकर हे स्वतः एका आदिवासी शाळेत शिक्षक होते. शाळेत अध्यापन करत असताना त्यांना जे अनुभव आले त्याची मांडणी या पुस्तकात त्यांनी केली आहे. ग्रामीण, आदिवासी मुलांना शिकविताना लेखक स्वतः काय आणि कसे शिकत गेले..? याचे मनोज्ञ वर्णन या पुस्तकात आले आहे. पाठ्यक्रमातून मूल्यशिक्षण शिकविताना आणि त्याची रुजवणूक करताना मुलांशी झालेला संवाद या पुस्तकात आलेला आहे तो अत्यंत वाचनीय आहे. मूल्यमापन कसे करावे..? ज्ञान रचनावाद कसा राबवावा..? शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करावे..? या संदर्भातील माहिती या पुस्तकात आली आहे. सखोल चिंतन, रोचक व रंजक लेखन आणि प्रांजळ अनुभव कथन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

नीलेश निमकर गेली २५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. बाल शिक्षण, प्राथमिक शिक्षण, शिक्षकांचा व्यावसायिक विकास आदी विषयावर त्यांनी काम केले आहे. आदिवासी मुलांचे शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. समाज माध्यमातून नियमित शिक्षण विषयक लेखन ते करत असतात. नीलेश निमकर आणि त्यांचे सहकारी ‘क्वेस्ट’ या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहेत, यावरून त्यांच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात येतो.

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे, दत्ता बाळसराफ, दिप्ती नाखले यांनी त्यांचे अभिनंदन केले.