
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई: भारतीय पत्रकारिता दिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे रविवार, १६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील महिला पत्रकारांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविकात प्रसारमाध्यमांमधील विशाखा समितीचे वास्तव तपासण्याची गरज व्यक्त केली. महिलांसाठी पत्रकारिता हे क्षेत्र आव्हानात्मक आहे, खूप कष्ट आणि अडचणी आहेत, परंतु सद्यस्थितीत महिला पत्रकारांची संख्या वाढली असल्याचे आशादायक चित्र या संमेलनातील दिवसभराच्या विविध चर्चासत्रांमधून समोर आले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या या संमेलनात महिला पत्रकारांच्या विविध प्रश्नांवरही प्रकाश टाकण्यात आला.
या संमेलनात राज्यभरातून अनेक महिला पत्रकार आणि पत्रकारितेच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. दिवसभर चाललेल्या या संमेलनात महिला संपादक आणि पत्रकारांना काम करताना येणाऱ्या आव्हानांसोबतच पत्रकारितेत एआयचा वापर आणि सुरक्षा यावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविक भाषणात महिला पत्रकारांनी स्वतःला ‘महिला पत्रकार’ अशा चौकटीत न ठेवता “मी पत्रकार आहे” ही ओळख अंगीकारावी, असा संदेश दिला. “महिला पत्रकारांना सुरक्षित आणि सक्षम कामाचे वातावरण देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच एआयच्या वाढत्या वापराबाबत काही ठोस धोरण ठरवण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राही भिडे यांचा पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. त्यांनी अडचणींचा विचार न करता महिला पत्रकारांनी काम केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ पत्रकार कल्पना शर्मा यांनी महिला पत्रकारिता: काल, आज आणि उद्या या विषयावर भाष्य करताना नैतिकता ते ब्रँड मॅनेजरपर्यंत झालेल्या पत्रकारितेच्या प्रवासाबद्दल परखड मत मांडले. कुपोषण, दारिद्र्य, आदिवासींचे प्रश्न, झोपडपट्ट्यांची उद्ध्वस्तता या मूलभूत समस्या ‘विकत नाहीत’, म्हणून मुख्य पानावर जागाच मिळत नाही, हे त्यांनी नमूद केले.
ग्राउंड रिपोर्टिंग करताना येणारे अनुभव या चर्चासत्रात विनया देशपांडे, शुभांगी पालवे, प्राची कुलकर्णी आणि शिरीन दळवी यांनी रिपोर्टिंग करताना महिला म्हणून कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते याबद्दल भाष्य केले. तसेच विनया आणि शुभांगी यांनी संरक्षण पत्रकारितेबद्दल मार्गदर्शन केले.
‘मराठी पत्रकारितेत वरिष्ठ पदावर महिला अजूनही मर्यादित’ या सत्रात मृणालिनी नानिवडेकर, अरुंधती रानडे, जान्हवी पाटील आणि मानसी फडके यांनी कारणमीमांसा केली.
पत्रकारितेत एआयचा शिरकाव, वापर आणि सुरक्षा या विषयावर विदुला टोकेकर आणि मुक्ता चैतन्य यांनी मार्गदर्शन केले. भारतातील लोकांचा इंटरनेटचा वापर प्रचंड आहे. त्यामुळे माध्यम शिक्षण मुख्य शिक्षणात समाविष्ट होणे गरजेचे आहे. परिणामी खोटी माहिती नियंत्रित होईल आणि लोकांना माध्यमाचा सुरक्षित वापर करता येईल, असे मत मुक्ता चैतन्य यांनी व्यक्त केले. तर विदुला टोकेकर यांनी एआय टूलचा वापर आपल्या कामात कसा करता येऊ शकतो यावर मार्गदर्शन केले.
महिला पत्रकारांना काम करताना येणारी आव्हाने या परिसंवादात प्रीती सोमपुरा, स्वाती नाईक, मोहिनी जाधव आणि सुकेशनी नाईकवाडे यांनी त्यांचे काम करतानाचे भीषण अनुभव मांडले. याच सत्रात महिला पत्रकारांना कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर विशाखा समितीची मदत कशी होऊ शकते यावर अनघा सरपोतदार यांनी मार्गदर्शन केले.
संमेलनाच्या समारोप प्रसंगी सीएनबीसीच्या कन्सल्टिंग एडिटर लता व्यंकटेश यांनी न्यूज चॅनलमध्ये ताण कसे हाताळले जाते आणि बातमीचे पुरावे असणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती दिली. तर लोकसत्ता चतुरंगच्या फिचर्स एडिटर आरती कदम यांनी पुरवणीचे विषय लिंगनिरपेक्ष कसे आखले जातात याबद्दल विचारमंथन केले.
या संमेलनातील परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार आणि फिचर्स एडिटर संध्या नरे-पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रणाली बाणखेले आणि ज्येष्ठ पत्रकार अलका धुपकर यांनी संवादक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. एमजीएम विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड मीडियाच्या प्राचार्या रेखा शेळके यांनी उद्घाटन सत्र आणि संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. एमजीएम विद्यापीठाचे कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड मीडिया हे महिला पत्रकार संमेलनाचे नॉलेज पार्टनर होते. तर मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टीव्हीजे यांनी या संमेलनाला सहयोग दिला.
मुंबई दि. १३ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिले जाणारे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०२५’ युसुफ मेहेरअली सेंटर, तारा (रायगड) यांना जाहीर झाले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ४१ व्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हे पारितोषिक दिले जाणार आहे. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
युसुफ मेहेरअली सेंटर ग्राम विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. सेंटरच्या कार्यात आरोग्य सेवा, शिक्षण, कृषी, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि सूक्ष्म वित्त यांसारख्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे. हे पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी युसुफ मेहेरअली सेंटर, तारा यांचे अभिनंदन केले आहे.
स्व. चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर २०२५ रोजी हा सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. दरवर्षी कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक' देण्यात येते.
या पारितोषिकाची सुरुवात १९९० पासून झाली. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, कवयित्री शांता शेळके, पत्रकार गोविंदराव तळवलकर, प्रा. एन.डी. पाटील, सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया, डॉ. यशवंत मनोहर आदी मान्यवर साहित्यिक आणि संस्थांना या पारितोषिकाने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई : समाजहितासाठी प्रशासन, माध्यमे आणि राजकारण्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याची गरज आहे. या तिघांनी एकत्र काम केल्यास समाजव्यवस्थेचा हास होतो. भ्रष्टाचार वाढतो आणि अखेरीस समाजाचे मोठे नुकसान होते, असे प्रतिपादन 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.
एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत शरद काळे स्मृती व्याख्यानात 'प्रशासन, माध्यमे आणि राजकारण : नवे समीकरण' या विषयावर कुबेर बोलत होते. धर्मसत्तेकडून होणाऱ्या लैंगिक शोषणावर प्रहार करणाऱ्या 'स्पॉट लाईट' या चित्रपटातील एका प्रसंगाचा दाखला कुबेर यांनी दिला, चुकीच्या गोष्टी दडपण्यासाठी संपादकांवर माध्यम, प्रशासन आणि धर्मसत्तेने एकत्रपणे काम करण्यासाठी दबाव आणला जातो. पण, संपादक या तिघांनी एकत्रपणे काम न करता स्वतंत्रपणे काम करण्याची गरज असल्याचे अत्यंत ठामपणे सांगतात. आज आपल्याकडेही याची निकड जाणवते. प्रशासनातून निवृत्त होऊन किंवा राजीनामा देऊन एखादा अधिकारी थेट निवडणूक लढवितो. सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होताच एखाद्या लहान राज्याचे राज्यपाल होतात. एखादा पोलीस अधिकारी राजीनामा देऊन थेर निवडणूक रिंगणात उतरतो आणि एखाद्या वृत्तपत्राचा संपादक निवृत्त होताच राज्यसभेत सदस्र होतो, असे चित्र आपण सर्यर पाहतो. अशा अधिकाऱ्यांनी न्यायाधीशांनी, संपादकांनी प्रामाणिकपणे, पारदर्शक काम केले असेल का, असा प्रश्न उपस्थित होतो, असेही कुबेर म्हणाले.
भ्रष्टाचार केवळ आर्थिक नव्हे तर नैतिकही असतो, असे सांगताना प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यासारखीच अवस्था माध्यमांतील मंडळींचीही झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांनाही माहिती अधिकाराच्या कक्षेत आणले पाहिजे, अशी भूमिका कुबेर यांनी मांडली. समाज सर्व सरकारी आदेश खाली मान घालून ऐकतो, हा प्रश्न आहे. आपल्याकडे प्रशासन, माध्यमे आणि राजकारण्यांना कुणीही प्रश्न विचारत नाही, ही समाजव्यवस्थेचा हास झाल्याची चिन्हे आहेत, असेही कुबेर म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख फरिदा लांबे यांनी केले. सुचित्रा काळे यांनी व्याख्यानामागील उद्देश स्पष्ट केला उपस्थितांचे आभार एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षा बालापोरिया यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराय चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी केले.

विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."





नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.