प्रवीण निकम

सामाजिक युवा पुरस्कार
2022

मूळचे साताऱ्याचे असणारे प्रवीण निकम, त्यांच्या वडिलांनी नोकरीसाठी गावची शेती सोडून पिंपरी-चिंचवडला स्थायिक झाले. वडील पिंपरीतील एका कंपनीत कामगार तर आई गृहिणी आहे. या जोडप्याने आर्थिक संकटांना न घाबरता, जोडधंदे करून आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवले. पिंपरी-चिंचवडच्या कामगार वसाहतीत जेमतेम परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या प्रवीण निकम यांनी नामांकित ब्रिटन सरकारच्या चेवेनिंग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत गरुडझेप घेतली. नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यामातून त्याचे नेतृत्व कौशल्यास वाव मिळाला.

परदेशातील उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहजासहजी मिळणारी मोठ्या पगाराची नोकरी न स्वीकारता प्रवीण यांनी पुन्हा भारतात पाऊल ठेवले आणि पूर्णवेळ ग्रामीण युवा, वंचित बहुजन समाजातील तरुणाईला उच्च शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी “समता सेंटर” ची स्थापना केली.

समता सेंटर फक्त शिक्षणावर काम करणारी संस्था नाही तर वंचित युवांमध्ये नेतृत्व, कौशल्य निर्माण करणारी एक केंद्र बनले आहे. बहुजन, दुर्बल तरुणाईला तसेच तृतीयपंथीयांना प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्रतिनिधित्व कसे मिळेल? यासाठी समता सेंटर काम करत आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काम देखील या सेंटरमार्फत चालवले जाते.

प्रवीण निकम यांना भारत सरकारचा ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ मिळाला आहे. तसेच २०१६ मध्ये पार पडलेल्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ झांबियाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रकुल निवडणूक निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे, संयुक्त राष्ट्राचे उपमहासचिव अमिना मोहंमद आणि नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी त्यांच्या सार्वजनिक भाषणांमध्ये प्रवीण यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले, माता रमाई, कर्मवीर भाऊराव पाटील, पेरियार, बिरसा मुंडा ही माझी प्रेरणास्थाने आहेत आणि त्यांनी केलेलं शाश्वत काम माझ्यासारख्या युवकाला मार्गदर्शक ठरत आहे," असे प्रवीण अभिमानाने सांगतात.

प्रवीण निकम यांचे हे सकारात्मक सामाजिक बदलाचे रचनात्मक कार्य असेच वृद्धिंगत होवो, या सदिच्छा!

यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी

यशवंतराव चव्हाण डिजिटल मीडिया